कोव्हिड-19 ग्रंथालय चळवळीसमोरची आव्हानात्मक संधी
गेले दोन महिन्यापेक्षा अधिक काळ सारा देश कोरोना या महामारीमुळे लॉकडाउन झालाय. सगळं विश्व थांबलं. वाचनालये ही बंद झाली. गेले दोन महिने पुस्तके वाचकांसाठी दुरावली, कपाटात त्यांचा जीव गुदमरला असेल. मात्र वाचक भरपूर वेळ असूनही या पुस्तकांच्या सान्निध्यात यायच्या मनस्थितीत नाहीत. अनेक संदर्भ बदलले, सवयी बदलाव्या लागल्या. वाचनाचं माध्यम पुस्तक न राहता डिजिटल पुस्तकांची शोध मोहीम सुरू झाली.
अनेक लेक्चर्स, अनेक सांगितिक-सांस्कृतिक कार्यक्रम फेसबुक लाईव्ह सुरू झाले, मिटिंगही 'झूम' वर होऊ लागल्या. जीवनशैली बदलली. सामाजिक अंतर ठेवणे अपरिहार्य झाले. स्वाभाविकपणे कुटुंबात रमणे अगर मन रमवणे आणि मोबाईलच्या माध्यमातून संपर्क ही पद्धती रूढ झाली.
सगळच बदललं अर्थ विश्व ठप्प झालं. शासनाचा निधी आटला. शासनाच्या खर्चाच्या प्राथमिकता बदलल्या. अर्थकारण कमालीचं मंदावले. शाळा बंद, महाविद्यालये बंद असा हा कधी न अनुभवलेला सन्नाटा सार जग अनुभवतय.
अशा या अपरिहार्य बदलाच्या जमान्यात वाचनालये सुरवातीलाच बंद झाली. आता हळूहळू सर्व व्यवहार सुरू होतायत मात्र वाचनालये सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. दोन महिन्यात वाचनाची आवड भागवण्यासाठी डिजिटल माध्यम सापडलाय. आता वाचक डिजिटल पुस्तकांशी जुळत घेऊ लागलाय. डिजिटल पुस्तक वाचन अपरिहार्यपणे होऊ लागले. पुस्तकांवर जीवापाड प्रेम करणारा वाचक इ-बुक स्वीकारू लागला. इ-बुकचा फायदा तोटा याचे जवळ समरस होऊन आपली वाचन तृष्णा वाचक भागवू लागला. आता इ-बुक्स अंगवळणी पडली. आता वाचनालय सुरू होतील पण इ-बुक्स जवळ जुळलेली तार घरीच बसून इ-बुक्स ची होणारी उपलब्धता त्याच्या वाचनालयात येण्याच्या सवयीला मारक ठरणार आहे.
पुस्तक प्रिंटिंग चा वेग मंदावला आहे. कॉस्टही खूप वाढीव होणार आहे त्यामुळे अनेक पुस्तके आता इ- बुक्स म्हणून उपलब्ध होतील. हे आव्हान वाचनालय व्यवस्थेसाठी खूप कठीण वाटणार आहे.
कोरोनामूळे स्वच्छता, टापटीप याला अनन्यसाधारण महत्व येईल आणि जुन्या वाचनालयाच्या सेटअप मध्ये वाचक भीतीने जाणे टाळेल. नवीन नेटका लुक उभा करण वाचनालयाच्या तुटपुंज्या निधी उपलब्धतेला परवडणार नाही. शासन अपरिहार्यपणे अनुदानाला कात्री लावेल, त्यामुळे वाचनालयाची आर्थिक घडी विस्कटेल, वर्गणी वाढ अपरिहार्य ठरेल पण वाचक या वाढीमूळे रुष्ट होईल, वाचकाला वर्गणी भरणे हे सुद्धा बोजा होणार आहे म्हणजे धोका आणि आर्थिक बोजा वाचकाला वाचनालयांपासून दूर नेत आहे असे चित्र पहिल्या टप्प्यात आहे.
वाचनालय चालकांची खरी कसोटी आता आहे ही आव्हाने कशी पेलली जातात. नवीन तंत्रज्ञान वापर कसा केला जातो ? वाचनालयाला आर्थिक पायांवर कसे उभे केले जाते आणि नवनवीन पुस्तक जर कमी येणार असतील तर दुर्मिळ जुन्या पुस्तकापर्यंत वाचकाला पोचवण्यासाठी काय क्लुप्ती, युक्ती लढवली जाते या वर बरच काही अवलंबून आहे.
आर्थिक स्थिती सुधारण्याची तरतूद करणे, त्यासाठी नक्की धोरण, त्यासाठी कार्यक्रम आणि अंमलबजावणी याला आता खूप महत्व येणार. वाचनालयाचे व्यवस्थापन हे व्यावसायिक दृष्टिकोन असलेल्या लोकांकडे जावे लागेल. तरच वाचनालयाचा डोलारा सावरता येईल. शासनाच्या निधीवर चालणारी वाचनालये आता या घडीला परवडणारी नाही.
निधी उभारणी खूप कठीण आहे पण इच्छा शक्ती मार्ग दाखवते. वाचनालयांनी छोटे छोटे उपक्रम सुरू ठेवले पाहिजेत. ग्रंथ प्रेमींजवळ संपर्क ठेवला पाहिजे. असलेली जुनी दुर्मिळ पुस्तक वाचकांपर्यंत पोचवली पाहिजेत. वाचनालयाचे व्यवस्थापक मंडळ हे प्रतिष्ठेचं पद म्हणून राहता कामा नये. सामाजातील आपली प्रतिष्ठा, आपला संपर्क, आपला शब्द वाचनालयासाठी वापरण्यासाठी सज्जता करण्याची ही वेळ आहे. आपल्या परिसरातील प्रत्येक शिक्षक वाचनालयाचा वर्गणीदार झाला पाहिजे. सामान्यातील सर्व प्रतिष्ठित वाचनालयाचे सभासद करून घेण्याचे अभियान झाले पाहिजे. वाचनालय जर सांस्कृतिक धरोहर असेल, शहराचा सुसंस्कृत चेहरा वाचनालय अधोरेखित करत असतील तर वाचनालयाच्या उर्जिता व्यवस्थेसाठी समाजाला एकत्र आणून हे शिवधनुष्य उचलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
वाचक शोधले पाहिजेत, वाचकांना काय आवडत हे शोधणं त्यानुसार पुस्तक उपलब्ध करून देणे यासाठी फोकस, प्रयत्न करण्याची तयारी करावी लागेल. प्रसंगी फिरते वाचनालय पुस्तक घरपोच सेवा असले उपक्रम राबवता येतील. वाचनालय ही सांस्कृतिक केंद्र म्हणून सातत्याने उपक्रमशील ठेवावी लागतील.
ग्रंथालय कर्मचारी यांच्या कामाची प्रत, व्याप्ती सुधारावी लागेल. ग्रंथपाल पुस्तक प्रेमी आणि वाचक असणे अनिवार्य असेल. पुस्तकांची माहिती असलेला स्टाफ महत्वाचा रोल बजावेल. ग्रंथालयांची पुस्तक मांडणी पद्धती बदलावी लागेल. वाचकांना पुस्तकाच्या रॅकमध्ये जाऊन पुस्तके हाताळण्याची सुविधा खूप प्रभावी ठरू शकेल. योग्य खबरदारी घेत हा उपक्रम राबवणारी वाचनालये लोकप्रिय ठरतील. युवावर्गाला हर प्रयत्न, नवे उपक्रम आयोजून वाचनालायपर्यंत आणावे लागेतील. इ-पुस्तक, नेट उपलब्धता, वाचकांसाठी स्टडी रूम सारखी सुविधा अनिवार्य असेल .
वाचनालयांनी फक्त पुस्तकांचं आदानप्रदान यापुरते आपले व्यवहार मर्यादित न ठेवता अधिक काही उपक्रम नव्याने अंगिकारावे लागतील.
निधी उभारणीसाठी सहकार जगताबरोबर बँकिंग जगत आणि विविध कंपन्या या सर्वांना मित्र करावे लागेल. छोटी वाचनालय मोठ्या सहकारी संस्थांनी दत्तक घ्यावीत अशी चळवळ उभारावी लागेल. समाजात दातृत्व खूप आहे. या दातृत्व शक्तीला जागृत करून त्यांना वाचनालयासाठी पैसा डोनेट करण्यासाठी उद्युक्त करावे लागेल.
वाचनालयाच सभासदत्व हा एक सामाजिक प्रतिष्ठेचा विषय करावा लागेल. सभासद, समाजसेवक, राजकीय नेते यांच्या वाढदिवसाला वाचनालयात डोनेशन देण्याची प्रथा पाडावी लागेल. हे सर्व सहकार्य मिळेल पण वाचनालय चालकांनी पारदर्शक राहून विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे.
वाचनालयाच्या गावात, शहरात असणारे सर्व शासकीय अधिकारी, न्यायाधीश यांनी वाचनालयाचे सभासद व्हावे म्हणून पाठपुरावा करावा लागेल. हे सर्व प्रयत्न वाचनालय चळवळ परत वेगानं मार्गक्रमित होण्यासाठी अत्यावश्यक वाटतात.
वाचनालय कालबाह्य होऊन देऊन चालणार नाहीत. काही उपक्रम राबवून वाचकांना ग्रंथ आणि ग्रंथांना वाचक मिळवून देण्यासाठी वाचनालयांनी काम करावं
वाट कठीण आहे पण कठीण आव्हान पेलून पुढे जाण्यात खरे समाधान असते.
अॅड.दीपक पटवर्धन