रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, रत्नागिरी येथे कृ.चिं.आगाशे विद्या मंदिर मधील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट गुरुवार दि. 22 रोजी कृ.चिं.आगाशे विद्या मंदिर मधील काही मुलांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाला क्षेत्र भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी 198 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या ऐतिहासिक वाचनालयातील विविध विभागांची माहिती घेतली. वाचनालयातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे कामकाज कसे चालते, पुस्तकांची मांडणी (वर्गीकरण) कशी केली जाते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रंथालय पहायला, अनुभवायला आलेले सगळेच विद्यार्थी चौकस होते. ग्रंथालयातील पुस्तकांचे अवलोकन करताना त्यांनी विविध शंकांचे निरसन करुन घेतले. ग्रंथालयात असलेली पुस्तक मांडणी, जागेचे बचत करणारे मोबाईल रॅक्स, पुस्तक शोधण्याची पद्धत अशा सर्व बाजूनी माहिती घेत त्यांनी पुस्तके चाळली. त्यावेळी सर्वात जूने पुस्तक, सर्वात मोठे पुस्तक, सर्वात जास्त व सर्वात कमी पृष्ठ असलेले पुस्तक हाताळताना त्यांच्या चेह-या वर दिसणारा आनंद अवर्णनीय होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांव्यतिरिक्त इतर वाचन साहित्याची ओळख झाली. अशा प्रकारच्या ग्रंथालय भेटीतून मोबाईल आणि टीव्हीच्या युगात पुस्तकांचे महत्त्व काय असते, हे मुलांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाते. ग्रंथालयातील ग्रंथ खजिना पाहून मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे शाळेने राबवलेला हा उपक्रम नक्कीच सामाजिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा आहे. या क्षेत्रभेटीसाठी त्यांच्यासोबत त्यांच्या मार्गदर्शक कृ.चिं.आगाशे विद्या मंदिरच्या ग्रंथपाल घाणेकर मॅडम व शिक्षक डुकले सर उपस्थित होते. वाचनालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रंथालयातून निघताना सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा या वाचनालयाला भेट देणार आणि या वाचनालयातील सर्व पुस्तकांचा आस्वाद घेणार असल्याचे सांगितले.