१९७ वर्षाच्या वाचनालयाची नवीन वास्तू आकार घेतेय


सलग २७ वर्षांचा एकहाती संघर्ष, प्रयत्नांची पराकाष्टा करत वाचनालयाच्या जमिनीचे लिज शासनाकडून प्राप्त करण्याचा संघर्ष यशस्वी झाला आणि जीर्ण झालेल्या वास्तूला निरोप देऊन नवीन वास्तू उभारण्याच आव्हान स्वीकारल. ज्या जागेवर वाचनालय उभे होते त्यावरील वाढीव FSI नगरपरिषदेने स्वतःच्या इमारतीत वापरला. त्यामुळे होतं तेवढंच बांधकाम करण्याची परवानगी प्राप्त झाली आणि एक टप्पा पार पडला. लाखोंची ग्रंथसंपदा आणि अन्य फर्निचर अन्यत्र सुरक्षित हलवण्याचं दिव्य ना-ना खटपटी करून पार पाडलं, जुन्या इमारतीला निरोप दिला आणि २५ डिसेंबर २०२४ पासून नवं बांधकाम प्रारंभीत झालं. ४५ लाख रुपये इमारत बांधणीसाठी योजनापूर्वक उभे केले होते त्याची ऊब होती. राजकीय खटपटी संपर्क यातून काही मदत उपलब्ध करून घेतली. मात्र पुरेशी रक्कम उपलब्ध नव्हती आणि आजही नाही.

खूप प्रयत्न करतोय संपर्क करतोय आवाहन करतोय. त्यातून रक्कम उभी राहते आहे. मी ज्या स्वरूपानंद पतसंस्थेचं नेतृत्व करतोय त्या स्वरूपानंदने भरीव मदत केली. रत्नागिरी जिल्हा बँकेने लक्षणीय मदत केली. सहकार क्षेत्रातल्या पतसंस्थानी बहुमोल मदत केली. बँकर्स एम्प्लॉयीज युनियन असोसिएशन, काही मित्र यांनीही मदत केली. वाचनालयाच्या सभासदांना आवाहन केलंय सभासदही अल्पस्वल्प पण बहुमोल मदत करत आहेत. रत्नागिरीतल्या कंपन्या, काही मोठ्या आस्थापना मदत करतील यासाठी प्रस्ताव दिलेत. पण माझी न्यूसन्स वॅल्यू कमी पडली आणि कोणत्याही कंपनी कडून डोनेशन प्राप्त करण्यात अजून यश आल नाही. अपवाद होता पितांबरी चा. पितांबरीचे CMD यांनी एकदा केलेली विनंती स्विकारत भरीव रक्कम दिली.

बैंकिंग क्षेत्राकडून माझ्या अपेक्षा होत्या. अनेक बँकांचे व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, स्वरूपानंदमधल्या चेंबर मध्ये ठेव मिळवण्यासाठी सतत आलेले असत. कोट्यवधी ठेव स्वरूपात त्याना देत आलो. मात्र नगर वाचनालयाच्या रचनात्मक कामासाठी अर्थसहाय्य देतील ही अपेक्षा अद्यापतरी व्यर्थ ठरली आहे. पण १९७ वर्षांचे वाचनालय.. त्याची पुण्याई कमी नाही! अधिक प्रयत्न करेन आणि आवश्यक निधी उभा करेन हा विश्वास आहे.

७ महिन्यात ८००० चौ. फुट बांधकाम उभं राहील आहे. तळमजल्याचं फिनिशिग सुरू झालाय, किंबहुना संपत आलंय. यापूर्वी जुन्या काळात बांधकामांना१० वर्ष ते २० वर्षाचा प्रदीर्घ वेळ लागला, बांधकाम रेंगाळलं.. तो कित्ता या वेळी गिरवायचा नव्हता. १ वर्षाच्या आत वाचनालय नव्या वास्तूत सुरू करायचे हे स्वप्नं.. हा ध्यास घेऊन सतत प्रयत्न करतोय. तळमजला, ग्रंथालय विभाग, पुस्तकं, कपाटं यासाठी जागा.. छोटी अभ्यासिका, वाचकांसाठी प्रशस्त जागा, बाल विभाग, डिजिटल सर्फिंग साठी स्वतंत्र डेस्क, प्रशस्त ग्रंथ शोकेस, संचालक सभाकक्ष आणि पहिल्या मजल्यावर भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह असा साज घेऊन येत्या नोव्हेंबर पर्यंत काम पूर्ण करण्याचा निर्धार केलाय. पाहू.. स्वामी कृपा काय कसं घडवते.

मी ३० वर्ष वाचनालयाचा पदाधिकारी आहे. वयाच्या तिशीत ही जबाबदारी घेतली त्यावेळी वाचनालयाची आर्थिक स्थिती खूप सामान्य होती. ती सावरत सलग २८८ सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रम वाचनालयाने आयोजित केले. ग्रंथसंपदा १ लाखांची सीमा पार करून पुढे नेली. वाचनालयाचे संगणकीकरण केले. स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचं यशस्वी आयोजित केलं. वाचनालयाचा जुना हॉल अद्ययावत केला. वाचनालयाला आर्थिक स्थैर्य निर्माण केलं. वाचनालयाची वाचक संख्या वृद्धिंगत झाली. पण ३० वर्षांचा अखंड सहवासाने निर्माण झालेल नात स्वस्थ बसू देत नव्हतं. २०० वर्ष पूर्ण करताना जीर्ण झालेली.. खरंतर मोडकळीस आलेली वास्तू रोज प्रश्नांकित बघते आहे.. आर्जवी मागणी करते आहे. अरे काही तरी कर नवा साज दे..! पुढच्या अमृत महोत्सवापर्यंतची तजवीज कर. ग्रंथांना सुरक्षित आकर्षक निवासस्थान निर्माण कर. हे मंदिर वाचकांच्या स्वागतासाठी सज्ज कर. वाचक चळवळीतील प्रदीर्घ परंपरा जपलेल्या या ग्रंथमंदिराचं नूतनीकरण हे जीवनाच ध्येय्य ठरव. प्रदीर्घ कालखंड नेतृत्व करत आहेस त्याचं चीज कर... हा होणारा भास मला स्वस्थ बसू देत नव्हता. कोट्यवधी रुपये कसे उभे राहतील? काम अर्धवट राहील तर काय? असे ना ना प्रश्न मन अस्वस्थ करत. सगळ्या सहकाऱ्यांची पण नवी इमारत व्हावी ही प्रबळ इच्छा होतीच, पण ते त्यांच्या क्षेत्रात खूप व्यग्र आहेत. त्याना वेळ देण अशक्य आहे. त्यांची त्यांची कामे खूप महत्वाची आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या, व्यावसायिक जबाबदाऱ्या यात सगळे व्यस्त आहेत. पण कोणी तरी पुढे होण्याची गरज होती. अध्यक्ष असल्याने मी पुढे होऊन जीर्ण वास्तूची आर्त हाक मी एकली आणि निर्धारपूर्वक नवीन बांधकाम सुरू केलं.

अजूनही नागरिक, वाचनालयाचे सभासद ‘वाचनालय नगर परिषद चालवते’, ‘शासन पूर्णांशाने फंडिंग करते’.. अश्या गैरसमजात आहेत. त्यामुळे वाचनालयाची आर्थिक मदतीची हाक कोणी गांभीर्याने घेत नाही. पण ही सर्व आव्हाने पेलून इप्सित ध्येय्य पूर्ण करणे आणि वाचनालयाला नव्या स्वरूपात अद्ययावत उभे करणे या मध्ये आता फक्त ६० दिवस बाकी आहेत . १ नोव्हेंबर च्या आसपास रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय नवीन सुंदर प्रशस्त वास्तूत स्थानापन्न झालेलं पहाण्यासाठी मन आतुरलंय. स्वामीची प्रेरणा आणि आशिर्वाद, वाचनालयाची पुण्याई, माझे खारीचे प्रामाणिक प्रयत्न.. याचं प्राकृत प्रकटन पहाण्यासाठी मन कातर झाल आहे विलक्षण आतुर झाल आहे. अॅड . दीपक पटवर्धन अध्यक्ष रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय,रत्नागिरी

समृद्ध ग्रंथसंपदा

वाचनालयात सभासद, वाचक यांचेसाठी सुसज्ज असा मुक्त वाचन विभाग केलेला आहे. वाचन विभागात निरनिराळी मसिके, पक्षिके, दैनिके उपलब्ध करुन दिलेली आहेत. याचा लाभ दिवसभरात जवळजवळ ४०० सभासद, वाचक घेत असतात. या विभागाचा फायदा विद्यार्थीवर्गाला आपल्या अध्यापनासाठाही होत आहे.

सुसज्ज व प्रशस्थ

गाव तेथे ग्रंथालय या उक्तीला सहाय्यभुत ठरणारी अशी ग्रथसाखळी योजना आमचे वाचनालय प्रभावीपणे राबवत असते. वाचानालायामध्ये विविध विषयांवरची १ लाख १५ हजार पुस्तके उपलब्ध आहेत, व या ग्रंथासंपदेमध्ये वेळोवेळी वाढ होत असते. विविध गावातील ग्रंथालयांना पुस्तके वाचनासाठी पुरविली जातात

विविधांगी उपक्रम

वाचनालयातर्फे सातत्याने दर्जेदार, सहित्यिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात ग्रंथप्रदर्शन, व्याख्यानमाला, कविसंमेलन, संगीत मैफल, सहित्यीकांशी गप्पाटप्पा, चर्चासत्र इत्यादी अनेक विविधांगी कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमांना रसिक रत्नगिरीकरांचा उदंड प्रतिसाद लाभतो.